Erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यात जवळपास २५ गुरांना लम्पीची लागण झाली आहे. अद्याप एकाही जनावराचा मृत्यू झालेला नाही. परंतु, या आजाराला सहज घेता येणार नाही. संतापजनक म्हणजे, शासनाकडून लम्पी प्रतिबंधक लस अद्याप उपलब्द झाली नसून लम्पी प्रतिबंधक लसींचा पुरवठा त्वरित व्हावा अशी जोरदार मागणी होत आहे.
एरंडोल तालुक्यात लम्पी आजाराने गस्त झालेल्या जनावरांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे बोलले जाते. ज्या गावांना ग्रामपंचायतीतर्फे लस उपलब्ध करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लस देण्याचे काम सुरू आहे लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा त्वरित व्हावा अन्यथा या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यात 51 ग्रामपंचायतीची संख्या असून गाय वर्ग जनावरांची संख्या अदमासे २६ हजार व म्हशींची संख्या १८ हजार इतकी आहे. तालुक्यातील आठ ते दहा ग्रामपंचायतींनी स्वतःच्या निधीतून प्रतिबंधक लस खरेदी केली आहे. ज्या गावांना ग्रामपंचायतीतर्फे लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी पशुसंवर्धन यंत्रणेतर्फे लसीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
एरंडोल, कासोदा, उत्राण, पिंपळकोठा, रिंगणगाव, आडगाव या गावांना पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दरम्यान तालुक्यात लम्पीची लागण सौम्य स्वरूपात झाली असून गुरांचा आजार उपचाराने बरा होत आहे असा दावा पशुवैद्यकीय यंत्रणेतर्फे केला जात आहे.१४ सप्टेंबर रोजी जवखेडे खुर्द येथे लम्पी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण व गोचीड गोमाशी निर्मूलन ग्रामपंचायत व एरंडोल पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले डॉ.ए एस महाजन यांनी लम्पी आजाराबाबत पशु पालकांना लम्पी व प्रतिबंधक उपाय योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.