जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । यावल शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळून आले. रतनलाल भगुरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, मूळचे परभणीमधील सेलू येथील रहिवाशी असलेले पशुअधिकारी भगुरे हे आत्माराम गुरूजी यांच्या मुश्तफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्यासमोर असलेल्या घरात राहत होते. ते यावल गुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते. आज त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिले असता, पशुअधिकारी रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला असून, घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अचानक झालेल्या मृत्यूने यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.










