⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

रेशन दुकानदारांचा काळा बाजार ; अखेर अमळनेर तालुक्यातील तीन दुकानांचे परवाने रद्द

जळगाव लाईव्ह । ४ मे २०२३ । सरकारकडून गोर-गरिबांना रेशन माफ धान्य पुरविले जात असून मात्र यातही काही ठिकाणी गरीबांच्या धान्यावर डल्ला मारला जात आहे. अशातच अमळनेर तालुक्यात रेशन दुकानांमध्ये साठ्याची अनियमितता व इतर कारणांमुळे अमळनेर तालुक्यातील तीन दुकानांचे परवाने अखेर रद्द केल्याच्या कारवाईने रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे.

नेमका काय आहे प्रकार?

अमळनेर तालुक्यातील एकलहरे, भरवस आणि भिलाली येथील रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप शासकीय नियमनुसार न करता त्याचा साठा करून ठेवला होता. याबाबत तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षक यांना या दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्यात भिलाली येथील दुकान क्रमांक ८४ येथे ४.६१ क्विंटल गहू व २१.७९ क्विंटल तांदूळ, एकलहरे येथील दुकान क्रमांक ८२ येथे १०.१७ क्विंटल गहू आणि १.८७ क्विंटल तांदूळ, भरवस येथील दुकान क्रमांक ६९ मध्ये १५.८८ क्विंटल गहू आणि ३१.७ क्विंटल तांदूळ जास्तीचा आढळून आला होता. तत्कालिन तहसीलदार मिलिंद वाघ आणि गोदाम व्यवस्थापक अनिल पाटील यांच्या काळात या दुकानांच्या चौकशा झाल्या होत्या.

या दुकानांचा रितसर पंचनामा करण्यात आला. यात दुकानदारांनी साठवून ठेवलेला हा माल त्यांनी लाभार्थ्यांना वाटप न करता त्याचा साठा केल्याचे उघड झाले. याबाबातच अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार या तिन्ही दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जळगाव येथे सुनावणी घेतली. त्यात त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तिन्ही दुकानांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत.