जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागातील घरकुल योजनांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा आणि असमाधानकारक कारभार करणे दोन अभियंत्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले असून, गटविकास अधिकारी (BDO) चंद्रकांत बोदरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

योगेश जनार्दन सपकाळे व योगेश राजेंद्र पाटील अशी कार्यमुक्त करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची नावे आहेत. या दोन्ही अभियंत्यांकडे सोपविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमधील घरकुल योजनांची कामे अत्यंत असमाधानकारक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

या संदर्भात त्यांना कामकाजात सुधारणा करण्यासाठी वारंवार सूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल न झाल्याने अखेर ही कडक कारवाई करण्यात आली.दोन्ही अभियंत्यांना २८ एप्रिल २०२६ रोजी मध्यांतरानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याकडील ग्रामपंचायतींचा कार्यभार इतर अभियंत्यांकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन्ही अभियंत्यांना कार्यमुक्त केल्यानंतर, घरकुल योजनेचे काम रखडू नये म्हणून त्यांच्याकडील ग्रामपंचायतींचा कार्यभार तातडीने इतर अभियंत्यांकडे सोपविण्यात आला आहे. योगेश सपकाळे यांच्याकडील कार्यभार ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मनोज राजेंद्र बोर्से यांच्याकडे देण्यात आला आहे. तर योगेश पाटील यांच्याकडील कार्यभार धनंजय संतोष वाणी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना आपल्याकडील सर्व शासकीय दप्तर आणि कार्यभार तातडीने हस्तांतरित करून तसा अहवाल कार्यालयाला सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जळगाव पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.







