जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२५ । बोगस कॉल सेंटरप्रकरणी अटकेत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांची पाच दिवसांची कोठडी शनिवारी संपली. मुदत संपल्यावर सर्व संशयितांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने ललित कोल्हे व त्याचा हस्तक राकेश अगारिया या दोघांना ८ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. तर उर्वरित सहा जणांना न्यायालयीन कोठडी दिली.

पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या ललित कोल्हे यांनी १८ इंटरनॅशनल कॉल व मुख्य हँडलर अकबर व आदिलशी १५ वेळा संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. जप्त लॅपटॉपमधून कॉल सेंटरच्या फसवणुकीची स्क्रिप्ट तसेच ६७ विदेशींना गंडवले गेल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.

जळगावच्या ममुराबाद शिवारात असलेल्या ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी २८ सप्टेंबरला एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते.
दरम्यान, पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सर्व संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर चार तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. आधीच्या कोठडीची मुदत संपल्यावर सर्व संशयितांना शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्ह्यातील अन्य मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने आठ तारखेपर्यंत कोल्हे यांच्यासह इतरांची पोलीस कोठडीत रवानगी केली. त्यावर संशयितांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी या पूर्वीच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय केले, त्याची माहिती देण्याची मागणी केली. कोल्हे हे माजी महापौर असल्याने त्यांना बोगस बोगस कॉल सेंटर प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.










