Ladki Bahin Yojana : पात्र नसताना घेतला लाभ; सरकारने खान्देशातील ‘त्या’ महिलेचे 7500 रुपये घेतले परत..
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२५ । नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार, धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana Update
खरंतर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेतून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सहा हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, ही योजना बंद होणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले.
आता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. त्यानुसार ही पडताळणी सुरूही झाली आहे. या योजनेत पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात झाली आहे.
त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेल्या धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेच्या खात्यातून ७५०० रुपये पुन्हा परत घेण्यात आले आहे. महिला पात्र नसतानाही तिने अर्ज केला होता. त्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतल्याचे समोर आले आहे. या महिलेने अन्य एका योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे या महिलेला पैसे पुन्हा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार सरकारी तिजोरीत ७५०० रुपये जमा झाले आहे.
दरम्यान जळगावसह धुळे, गडचिरोली, वर्धा, पालघर या जिल्ह्यातून अपात्र महिलांनी अर्ज केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारींमुळे केसरी आणि पिवळे शिधापत्रक वगळता सर्व अर्जांची छाननी होणार आहे.