कुर्हा ग्रामपंचायतीचे सौर उर्जेवरील पथदिवे लांबवले!
Bhusawal News -जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुर्हा ग्रामपंचायतीचे 30 हजार रुपये किंमतीचे सौर उर्जेवरील पथदिवे व तीन बॅटर्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवार, 6 रोजी सायंकाळी सात वाजता ही चोरी झाली. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.
कुर्हा ग्रामपंचायतीचे शिपाई संदीप रघुनाथ बारी (43) यांच्या फिर्यादीनुसार, कुर्हे गावातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ सौर उर्जेवरील पथदिवे लावण्यात आले होते व त्यासाठी तीन बॅटर्याही होत्या. मंगळवारी सायंकाळी सात वाजता संशयीत आरोपी सागर रामदास सोनवणे (26), दयानंद निवृत्ती कोळी (22) व चेतन गोकुळ सोनवणे (18, रा.कानसवाडी, जि.जळगाव) यांनी संधी साधून बॅटरी व लाईट लांबवले.
चोरी होत असताना तरुणाने हटकल्यानंतर आरोपींनी आम्ही ठेकेदाराची माणसे असून पथदिवे बंद असल्याने दुरुस्तीसाठी नेत असल्याची थाप मारली मात्र तरुणाने चोरी होत असताना व्हिडिओ बनवला होता व त्यातील फुटेजच्या आधारे आरोपींना तालुका पोलिसांनी पकडले. 1तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख करीत आहेत.