⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना : जाणून घ्या संपूर्ण माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । सामूहिक / नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- (रुपये – दहा हजार मात्र) एवढे अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये – 2000/- ( रुपये दोन हजार मात्र) एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते.

खालील अटींची पुर्तता करणाऱ्यास सदर योजनेचा लाभ मिळू शकेल

1) वधू जळगाव जिल्हयाची स्थानिक रहिवाशी असावी, शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला, उत्पन्नाची मर्यादा – वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त असू नये त्यासाठी उत्पनाचा दाखला, या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाही कारण त्यांच्या साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र योजना राबविण्यात येत आहे.

2) नोंदणीकृत विवाह ( Registered Marriage ) प्रमाणपत्र

3) सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे, बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयाचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये 20/- च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहील.

अधिक माहितीसाठी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरवध्वनी क्रमांक – 0257-2228828वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.