⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

Big Breaking : डी.डी.बच्छावांच्या घरात चाकू, पिस्तुलधारी दरोडेखोरांचा हैदोस, कुटुंब बचावले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या चोरीने अगोदरच नागरिक धास्तावले असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील नामांकीत वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरावर पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले असल्याचे समजते. दरोडेखोरांच्या हल्ल्यात किरण बच्छाव व त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव हे परिवारासह रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात राहतात. बच्छाव सर लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेलेले होते. मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला.

नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. पत्नीचा आवाज ऐकून घरात फ्रेश होत असलेले किरण बच्छाव देखील पुढे आले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.

दरोडेखोरांनी किरण बच्छाव यांच्यावर चाकूने वार केले परंतु ते थोडक्यात चुकले. बंदुकीने देखील गोळी झाडण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला मात्र केवळ त्यातून आवाज आल्याचे समजते. किरण बच्छाव यांच्या पत्नीने खिडकीतून जोरात आवाज दिला असता शेजारील महिलेने सर्व दृश्य पाहिले व आरडाओरडा केली. बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी एक आयफोन हिसकवला आणि मागील बाजूने पळ काढला.

दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी एकाकडे पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. पिस्तूल नकली असल्याची माहिती समोर आली आहे. घराच्या मागील बाजूस ३०० मीटर अंतरावर आयफोन, जॅकेट, मफलर आणि मिरची पूड पॅकेट मिळून आले आहे. दरोडेखोरांनी तिजोरी आणि डी. डी. बच्छाव व त्यांच्या पत्नी कुठे असल्याची देखील विचारणा केली होती. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह अधीक्षक श्री.गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस पोहचले आहेत. माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि बच्छाव कुटुंबियांचे मित्र मंडळी देखील त्यांची भेट घेत विचारणा करीत आहेत. दरोडेखोरांनी रेकी करून हल्ला केल्याचा अंदाज आहे.