जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । देशात आणि राज्यात सध्या इंधन टंचाई आणि दरवाढीमुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल -डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील पेट्रोल पंपावर एक धक्कादायक आणि जीवघेणी घटना घडली.

पंपावर पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक नसल्याने कर्मचाऱ्याने इंधन देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने दोन अनोळखी तरुणांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या पोटात थेट चाकू खुपसला. या हल्ल्यात तुषार गुरव (वय २१) हा कर्मचारी जखमी झाला. हा संपूर्ण थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील पंप कर्मचारी प्रचंड धास्तावले असून पंपांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.

पारोळा येथे डिझेलचा तुटवडा जाणवू लागल्याने संतप्त शेतकरी आणि नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर नागरिकांनी आपल्या दुचाकी आणि डिझेलचे कॅन आडवे लावून रस्ता अडवून धरला. १५ ते २० मिनिटांपर्यंत चाललेल्या या तीव्र आंदोलनामुळे महामार्गाच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन पेरणीच्या तोंडावर ट्रॅक्टर आणि शेतीच्या पंपासाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
दरम्यान, या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. जळगाव मध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं १२ तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही… चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? असा टोला त्यांनी लगावला आहे.







