खान्देश गारठला; जळगाव जिल्ह्याला थंडीबाबत हवामान खात्याचा महत्वाचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. खान्देशातील काही ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी पडत आहे. विशेष धुळ्यात तापमानाचा पारा सलग दुसऱ्या दिवशी देखील 4 अंशावर स्थिरावला आहे. यामुळे शिमला, मनाली अन् जम्मू काश्मीरपेक्षाही कमी थंडी धुळेकरांना जाणवत आहे. जळगावमध्येही सलग दुसऱ्या दिवशी नीचांकी तापमानाची नोंद झालीय. दरम्यान जळगावसह काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दोन दिवसात थंडीची लाट
मागील दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात रात्री आणि पहाटेचे किमान तापमान बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले. तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत घसरले. जळगावसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा ह्या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते.
सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शिमल्यासारखी थंडी पडली आहे. यात खान्देशातील नंदुरबार धुळे जळगांव अश्या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून धुळ्यात सातत्याने तापमानात घट होत आहे. जळगावामधील तापमानात देखील घट होत असल्याने जळगावकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. जळगावात रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा ७.८ अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या तापमानातदेखील लक्षणीय घट झाल्यामुळे दुपारच्या वेळेस गारठा जाणवत आहे. दरम्यान, आज १७ व १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीपासून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
थंडीचा रब्बी पिकांना फायदा
कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक फायदा हा रब्बी पिकांना होत आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी थंडी उपयुक्त ठरणार आहे.