⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नशिराबादला खंडेराव महाराजांच्या यात्राेत्सवाचे आयाेजन

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । तालुक्यातील नशिराबाद येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्राेत्सवाला २०० वर्षांची परंपरा आहे. यंदा येत्या १६ एप्रिलपासून यात्राेत्सवाला सुरुवात हाेत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ रोजी सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम हाेईल.

सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराजांचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी १६ एप्रिल राेजी सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ होईल. दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजन होईल. चैत्र वद्य प्रतिपदेला अर्थात १७ रोजी पहाटे श्रींची पूजा, सायंकाळी ६ वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्याहस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता कठडे मिरवणूक निघणार आहे. रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. १८ व १९ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस महापूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल.

यांचा समावेश

अध्यक्षपदी योगेश पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, सचिव मोहन येवले, सेक्रेटरी पंकज महाजन यांचा समावेश आहे. माजी सरपंच विकास पाटील, प्रकाश बोंडे, किशोर पाटील आदींचे सहकार्य आहे. गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

धाेबी घराण्याला बारागाड्या ओढण्याचा मान

चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सुमारे दोनशे वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आजही सुरूच आहे. कै. दामू धोबी यांनी ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्या आधीही कित्येक पिढ्यांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाड्या ओढण्याचे त्यांचे पाचवे वर्षे आहे.
सुदाम धोबी