जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला गुरुवारी होणारा सावदा शहरातील प्रसिद्ध असा खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव यंदादेखील कोरोनाचे शासकीय नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. स्थानिक व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आठवडे बाजारातील देवस्थान खंडेराव महाराज मंदिराचा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला यात्रोत्सव होतो.

दरम्यान, कोरोनाची भीती पाहता यंदा मंदिरे खुली केलेली असली तरी आरोग्य विभागाच्या सूचना व नियमांचे पालन करून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता उत्सव साजरा होईल. दरम्यान, या उत्सवाला बारा गाड्या ओढण्याची ३०० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार ९ डिसेंबरला पवार कुटुंबातील सहाव्या पिढीला बारागाड्या ओढण्याचा मान मिळेल.

परंपरेनुसार सुपडू पवार, वसंत पवार, अशोक पवार यंदा राहुल अशोक पवार यांचा मान आहे. तत्पूर्वी, मंदिरात सकाळी आरती, तळी भरणे पूजा, अभिषेक असे कार्यक्रम होतील. संतोष जोशी हे पौरोहित्य करतील. अशोक पवार व राहुल पवार हे मंदिराची धुरा सांभाळत आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येताना मास्क लावावा. फिजिकल डिस्टन्स पाळावे. असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.











