भूखंड घोटाळ्याबाबत खडसेंचे विधान परिषदेत मोठं विधान, म्हणाले…

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. यावरुन विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं कारण सांगत शिवसेना-भाजपा (BJP-Shivsena) सरकारला घेरले. यावेळी त्यांनी स्वत:वर आरोप झालेल्या कथित भूखंड घोटाळ्याबाबतही पुन्हा एकदा भाष्य केलं.

आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भूषण देसाई यांनी वडिलांची साथ का सोडली? त्याचे कारण म्हणजे भूषण देसाई यांचे ४ लाख १४०० स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचे अवैध वाटप केले. त्यात जवळपास ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. उच्चस्तरीय समिती नेमली. भाजपा आमदार मागे लागले. चौकशी सुरू झाली. सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहे म्हणून ही पाऊले उचलली.

आता हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे असा निरोप भूषण देसाईंकडे पाठवला. पण तो आता पावन झाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली आला. तुमच्याकडे आला तर सगळं संपलं. माझ्यावर भूखंडाचे आरोप झाले. एक रुपयाचा माझा संबंध त्याच्याशी नाही. तरी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात सरकारला विचारला.