⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

खडसेंनी दिला चंद्रकांत पाटलांना धक्का : समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । बोदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील सरपंच कमलाकर तायडे, शिवसेना शिंदे गट शाखाध्यक्ष लहू घुळे, उपसरपंच पवन कोंगळे यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसे उभयंतांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

तीन वर्षात आमदारांकडून भ्रमनिरास
सरपंच कमलाकर तायडे म्हणाले की, गावात विकासकामे होतील या आशेने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत होतो परंतु तीन वर्षात भ्रमनिरास झाला. याउलट एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बोदवड गावात आतापर्यंत अनेक विकासकामे झाली. यापुढे सुद्धा एकनाथराव खडसे विकासकामांना निधी उपलब्ध करून देतील हा विश्वास आहे. जनसंवाद यात्रे दरम्यान बोदवड येथिल शिंदे गटाचे इतर पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे कमलाकर तायडे यांनी सांगितले.

बोदवड शहरासाठी विकासनिधी दिला
एकनाथराव खडसे म्हणाले की, बोदवड शहराते सभागृह, बुद्ध विहार, रस्ते, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सुविधांसाठी आतपर्यंत निधी उपलब्ध करून दिला आहे. बोदवड फाटा ते पूर्णा नदी पर्यंत रस्ता डांबरीकरण साठी निधी उपलब्ध करून दिला तसेच भविष्यात सुद्धा राहिलेल्या विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात स्वागत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती दशरथ कांडेलकर, प्रवीण कांडेलकर, माजी सरपंच ज्ञानदेव मांडोकार, वामन पाटील, राष्ट्रवादी युवक शाखाध्यक्ष योगेश इंगळे, उपाध्यक्ष पंजाबराव पाटील, वसंत पाटील, विशाल रोटे, चेतन राजपूत, समाधान माळी व पदाधिकारी उपस्थित होते.