⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

खडसेंच्या नाकावर टिच्चून जळगावच्या पवारांनी घेतली बारामतीच्या पवारांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२३ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धुरा पक्षाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली होती. जिल्हा बँकेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचाच उमेदवार बसेल, हे स्पष्ट होते. पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले.

मात्र निवडणुकीत मोठा ट्विस्ट येत राष्ट्रावीच्या संचालकाने बंडखोरी करत भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. यात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने विजयी झाले. संजय पवारांची बंडखोरी हे थेट खडसेंना पक्षातूनच मिळालेले खुले आव्हान मानले गेले. याच संजय पवारांनी मुंबईत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय पवार यांनी अजित पवारांची मुंबईत भेट घेतली. यासोबत त्यांनी सहकार मंत्री अतुल सावे, वैद्यकिीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली. सर्वपक्षीय नेत्यांच्या या भेटींमुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदीची चर्चा रंगली आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असतांनाही संजय पवारांनी भाजप-शिवसेनेच्या मदतीने एकनाथ खडसेंना दे धक्का दिला. मात्र त्याच पवारांना अजित पवारांकडून पाठबळ मिळतेय का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.

खडसेंच्या नाराजीकडे दुर्लक्ष!
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, त्यानंतर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी अर्ज दाखल केला. निवडणुकीनंतर संजय पवार यांना ११ तर रविंद्रभैय्या पाटील यांना १० मते पडली. यावर खडसेंनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. मात्र खडसेंच्या नाराजीकडे दुर्लक्ष करुन दोन्ही पवारांची भेट घडविण्यात आली असल्याची चर्चा आहे.