पक्ष वाढीसाठी खडसेंना राष्ट्रवादीत एन्ट्री पण बालेकिल्ल्यातच दोन सलग पराभव….!

जळगाव लाईव्ह न्यूज : चिन्मय जगताप : जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांना पक्षात घेतले होते.मात्र, खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन मोठ्या सहकारी संस्था गमविल्या आहेत. यामुळे जिल्हा स्तरावर पक्षात यादवी पाहायला मिळत आहे. कारण पक्ष अंतर्गत आता कलह निर्माण झाला असून, एकनाथ खडसे विरोधक व समर्थक असे दोन गट निर्माण झाले असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर २०२१ मध्ये राष्ट्रवादीने जिल्हा बँकेत यश मिळवले. मात्र, तेव्हाही भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. आता त्याच जिल्हा बँकेत भाजपचा एकमेव संचालक असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या हातातून जिल्हा बँक हिसकावली.

महाविकास आघाडीच्या हक्काची असलेली जिल्हा बँक खडसेंच्या नेतृत्वात गमावल्यानंतर जिल्हा स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे खडसेंबाबत तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.मात्र अजून अधिकृतरित्या यावर कोणीही बोललेले नाही.या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील यांच्याशी चर्चा केली असता पाटील यांनी अशी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचे सांगितले. तर आमच्या पक्षात गद्दारी झाली म्हणून आमचा पराभव झाला असे त्यांनी सांगितले.

आधी जिल्हा दूध संघात भाजपने राष्ट्रवादीला धूळ चारली. यावेळी खुद्द एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला. नंतर आता जिल्हा बँकही गेली. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. जळगाव महापालिकेत २०१८ मध्ये राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नव्हती. तर जि. प. च्या २०१७ च्या निवडणुकीत केवळ १७ जागा जिंकता आल्या होत्या. आता जिल्ह्यात १० नगरपालिका, जळगाव महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सहकार गमावलेल्या राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवता का ? कि यातही खडसेंना पराभव स्वीकारावा लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.