भुसावळच्या नजीम बानो यांचा केरळच्या स्नेहालयने केला सांभाळ, ६ वर्षांनी परतल्या घरी
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील शिवाजी नगरातून नजीम बानो या मानसिक रुग्ण महिला सन २०१६ मध्ये हरवलेल्या असून केरळातील कासरगोड भागात आढळल्या होत्या. स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर, पोलिस व शहरातील सुभाष पाटील यांच्या मदतीने तब्बल पाच वर्षांनंतर पुनर्वसन केंद्राच्या पॉली दास यांनी शुक्रवारी नजीम बानो यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले. तर शहादा येथील बेपत्ता मानसिक रुग्ण महिला रंजना पवार यांनाही नातेवाइकांकडे सोपवले.
केरळातील रेल्वे पोलिसांनी काही दयनीय अवस्थेतील आजारी महिलांना पुनर्वसन केंद्रात भरती केले होते. तेथे मेडिटेशन व औषधोपचार झाल्यानंतर महिलांची प्रकृती घराचा पत्ता सांगण्यापर्यंत सुधारली. यातील एक महिला राईबाई हिने परभणी जिल्ह्यातील बोरीचा उल्लेख केल्याने स्नेहालयाच्या पॉली दास या स्वयं-सेविकेने शोध सुरु केला. यात भुसावळातील व सध्या तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष पाटील यांनी मदत केली. परभणी तील महिलेला नातेवाइकांकडे सोपवल्यानंतर शुक्रवारी भुसावळातील शिवाजी नगरातील नजीम बानो व शहादा येथील रंजना पवार यांना सोबत घेत पॉली दास यांनी सचखंड एक्स्प्रेसने भुसावळ गाठले.
भुसावळ शहरामध्ये नजीम बानो यांना भाऊ रईस खान व वहिनी रुकैय्याबानो खान यांच्या हवाली केले. तर रंजना पवार यांना नातेवाइकांकडे सोपवले. नजीम बानो या गतीमंद, मानसिक रुग्ण असल्याने सन २०१६ मध्ये घरुन निघून गेल्या होत्या, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. अनेकवेळा शोध घेवूनही त्या सापडल्या नव्हत्या. शहादा येथील रंजना पवार या सन २०१४ पासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
आता ‘त्या’ बहुतांश बऱ्या
विविध आघातांमुळे मानसिक रुग्ण बनलेल्या या दोन्ही महिलांची प्रकृती मेडिटेशन व औषधोउपचारानंतर बऱ्यापैकी सुधारली. वसमत तालुक्यातील बेडगाव येथील राईबाईंचा शोध घेतल्यानंतर, भुसावळ व शहादा येथील या दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना शोधता आले. मेडिटेशनमुळे त्या आनंदी जिवन जगतील, अशी आशा पॉली दास, समुपदेशक, स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर केरळ यांनी व्यक्त केली.
- Gold Rate : ग्राहकांचं टन्शन वाढलं! जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा तोळा पुन्हा ८० हजारांवर
- Jalgaon : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला 10 वर्षांची शिक्षा
- जळगावचे किमान तापमान स्थिर ; आज कसं असेल हवामान?
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन