
जगतगुरू ज्ञानेश्वर देवाजीचार्य महाराज यांच्या शुभहस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील नोबेल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आणि जयश्री जयदीप पाटील यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मगंगा’ या लोकप्रिय मराठी पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच अहमदाबाद येथील सतपंथ धाम प्रेरणा पीठ येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. पूज्य जगतगुरू ज्ञानेश्वर देवाजीचार्य महाराज यांच्या शुभहस्ते या हिंदी आवृत्तीचे लोकार्पण झाले.
पूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या ‘मनहर ज्ञान’ या ग्रंथावर आधारित प्रवचनांच्या मालिकेतून ‘अध्यात्मगंगा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आध्यात्माचा नेमका अर्थ, त्याची जीवनातील आवश्यकता आणि मनःशांतीसाठी आध्यात्माचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे मराठी वाचकांमध्ये या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, गुजरातसह विविध राज्यांतून हिंदी आवृत्तीची मागणी होत होती. या मागणीला प्रतिसाद देत नोबेल पब्लिकेशनने हिंदी आवृत्ती प्रकाशित केली आहे.
या प्रकाशन सोहळ्यास मंचावर श्री जनार्दन हरीजी महाराज, विजयप्रकाशजी महाराज,नोबेल फाउंडेशन व सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पाचे प्रमुख श्री. जयदीप पाटील तसेच सतपंथ प्रेरणा पीठचे संचालक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘अध्यात्मगंगा’ या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना जगतगुरू ज्ञानेश्वर देवाजीचार्य महाराज म्हणाले, “प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्माची आवश्यकता आहे. मनःशांतीसाठी आध्यात्म हा उत्तम आधार आहे. केवळ पूजा-अर्चा केल्याने आपण आध्यात्मिक होत नाही; त्यासाठी आध्यात्माची खरी ओळख होणे आवश्यक आहे. जनार्दन महाराज यांच्या वचनांवर आधारित ‘आध्यात्मगंगा’ हे पुस्तक भाविकांना आध्यात्माची ही ओळख करून देणारे आहे. प्रत्येक घरात हे पुस्तक असावे.”
यावेळी परंपूज्य जनार्दन महाराज यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘मनःरत ज्ञान’ हा ग्रंथ श्री हंसतेजजी महाराज यांच्या श्लोक व दोह्यांवर आधारित आहे. या ग्रंथातील २० श्लोकांवर आधारित ५८ प्रवचनांची मालिका कोविड काळात संपन्न झाली. त्यातील सुरुवातीच्या सहा श्लोकांवरील प्रवचनांच्या आधारे ‘आध्यात्म गंगा’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
“श्री हंसतेजजी महाराज यांचे आध्यात्माचे अगाध ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भविष्यात ‘आध्यात्म नर्मदा’, ‘आध्यात्म सरस्वती’ अशा एकूण सात खंडांची निर्मिती करण्यात येणार आहे,” अशी माहिती जनार्दन महाराज यांनी यावेळी दिली.
अहमदाबाद येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून ‘आध्यात्म गंगा’*चा संदेश देशातील हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. दरम्यान, या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती नोबेल पब्लिकेशनतर्फे देण्यात आली.





