खाटू श्याम-अजमेरसाठी आता नियमित ट्रेन; भुसावळसह जळगाव, धरणगाव, अमळनेरच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मे 6, 2026 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम आणि अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातून भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या प्रतिसादाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काकीनाडा टाऊन–हिसार विशेष एक्स्प्रेस नियमित सेवेच्या रुपात धावणार आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

khatushyam ajmer train

पूर्वी खाटू श्याम (रींगस जंक्शन) किंवा अजमेरला जाण्यासाठी खान्देशातील नागरिकांना खाजगी बसचा महागडा प्रवास करावा लागायचा किंवा अनेक रेल्वे गाड्या बदलाव्या लागायच्या. मात्र, आता काकीनाडा–हिसार ही स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे.

या रेल्वे गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भुसावळ व जळगाव या मुख्य स्थानकांबरोबरच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर या स्थानकांवरही या गाडीला अधिकृत थांबा देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यासह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या धावणारी ०७७१७/०७७१८ ही विशेष साप्ताहिक ट्रेन आता नवीन क्रमांकासह नियमित एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रुपांतर झाल्यानंतर गाडी क्रमांक १७२९५ काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस आता १२ मेपासून काकीनाडा टाऊन येथून तसेच गाडी क्रमांक १७२९६ हिसार ते काकीनाडा टाऊन साप्ताहिक एक्स्प्रेस १५ मेपासून हिसार येथून धावणार आहे.

पैकी १७२९५ एक्स्प्रेस दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून ०५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे १०.२० वाजता पोहचेल. १७२९६ एक्स्प्रेस दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी ०२.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे रात्री ०९.३५ वाजता पोहचेल. दोन वातानुकूलित प्रथम, तीन वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची रचना असेल.

या स्थानकांवर थांबा असेल?
दोन्ही बाजूने सामलकोट, राजमुंद्री, तादेपल्लीगुडम, एलुरु, विजयवाडा, गुटूर, मिरयालगुडा, नालगोंडा, चार्लापल्ली, मेडचल, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तौरगढ, भिलवारा, बिजेनगर, नासिराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा, रींगस जंक्शन, सिकर, नवलगढ, झुनझुनू, चिडावा, लोहारू, सदूलपूर स्थानकांवर थांबा असेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now