जयश्री महाजन या एकनाथ शिंदे यांच्या जोरावरच झाल्या महापौर !

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांवर गद्दारी केल्याचे चुकीचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे नेते आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार हे बाळासाहेबांचे विचार पुढे टीकावे म्हणूनच काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी बुधवारी झालेल्या महिला आघाडीच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावर जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांचे महापौरांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले की महापौर

जयश्री महाजन या एकनाथ शिंदे यांच्या जोरावरच महापालिकत महापौर झाल्या. महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला तो केवळ एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळेच, त्यामुळे महापौरांनी यांचे उपकार जाणून, त्यांच्यासोबत न येता, ठाकरे गटात राहिल्या. महापौरांनीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी निष्ठेचे धडे न देता, जळगावकरांना सुविधा कशा दिल्या जातील याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांवर टीका करण्याआधी महापालिकेत सत्ता कोणामुळे आली, महापौरपद कोणाकडे मिळाले याकडे अधिक लक्ष द्यावे. जळगावकरांचा विकास न करता आल्यानेच महापौर आता प्रसिध्दीसाठी केव्हा पालकमंत्री यांच्यावर टिका करतात, तर केव्हा मुख्यमंत्रीसाहेबांवर टीका करतात.