जयंत पाटील यांचा मोठा दावा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज | 28 मार्च 2023 | सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावनीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाही, तर कार्यकर्ता ती निवडणूक लढत असतो आणि इतर निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे असले तरी परिस्थितीनुरूप स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून भाजपकडून धार्मिक भावना भडकवण्याचे काम सुरू आहे. तर देशात कुठल्या घोषणा दिल्या जातील किंवा कोणी काय बोलावे, याचा देखील निर्णय कोर्टच द्यायला लागलं असल्यामुळे आता बोलण्याचीदेखील सोय राहिली नाही, अशा मार्मिक टीका त्यांनी शिंदे भाजप सरकारवर केली.

पदाधिकार्‍यांचे कान टोचले

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सोमवारी पारोळा, भुसावळ आणि जामनेर येथे पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या. प्रत्येक तालुक्यातून पक्षाच्या कामाचा अहवाल घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी काय करण्यात आलेली आहे, कोणी बुथनुसार काय काम केले, सदस्य नोंदणी अभियानात कोणी काय काम केले, याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांनी घेतला आणि संघटनात्मक बांधणीवर कार्यकर्त्यांकडून माहिती जाणून घेतली. गाफील न राहता पक्षाचा प्रचारक म्हणून काम करा, नुसती पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, अशा शब्दात जयंत पाटील यांनी पदाधिकार्‍यांचे कान टोचले. यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा बँक निवडणुकीबद्दल गोलमाल उत्तर

जळगाव येथे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना जयंत पाटील म्हणाले की, शिंदे गटामुळे भाजपाला किंमत राहिलेली नाही. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना फोडून भाजप-शिवसेना शिंदे गटाने अध्यक्षपद बहाल केले. त्यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाला स्वबळावर विरोधकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस शोधावा लागतो. त्या शिवाय त्यांना कोणताही पर्याय नसतो.