⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

हरियाणाच्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत जळगावच्या ‘विधी’ला सुवर्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील सेक्टर १२ मध्ये चौथ्या राष्ट्रीय फिनस्वीमिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलची विद्यार्थिनी कुमारी विधी महेश वर्मा हिने १३ वर्षे वयोगटात पहिल्याच प्रयत्नात दोनशे मीटर फिनस्वीमिंग प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी विधी वर्मा ही तिच्या वयोगटातील पहिलीच जलतरणपटू ठरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौथ्या राष्ट्रीय फिंस्विमिंग स्पर्धेचे आयोजन हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथील सेक्टर १२ मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी अनेक राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यात जळगाव येथून विधी महेश वर्मा (वय-१३) ही देखील या स्पर्धेत सहभागी झाली होती. विधीने पहिल्याच प्रयत्नात दोनशे मीटर फिनस्वीमिंग प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले. अशी कामगिरी करणारी विधी वर्मा ही तिच्या वयोगटातील पहिलीच जलतरणपटू ठरली आहे.

तिच्या या नेत्रदीपक कामगिरी मुळे जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रमुख श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत १८ राज्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विधीची स्पर्धा ही प्रामुख्याने जम्मू काश्मीर व दिल्लीच्या स्पर्धकांशी होती. परंतु विधीने अत्यंत मेहनतीने या स्पर्धेत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर इजिप्त येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी देखील संधी मिळणार आहे. विधी ही गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धेसाठी तयारी करत असून तिला या स्पर्धेत तयारीसाठी तिचे वडील महेश वर्मा व आजोबा संजय बोरसे यांचे सहकार्य लाभले.