जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. यातच पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यात विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘ईश्वर चिठ्ठी’ काढत जाहीर झालेल्या सोडतीनुसार ५ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या असून त्यात अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जमातीसाठी २, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी २ जागांचा समावेश आहे.

ही सोडत प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी दुपारी जळगावच्या पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी भूमिका व्यास, राहील इरफान खान आणि तनिष्का आहेर या विद्यार्थ्यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. या प्रसंगी अनेक अधिकारी उपस्थित होते. या सोडतीदरम्यान निवडणुकीतील दहा गणांसाठी आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले.

सोडतीतून पाच जागा महिलांसाठी राखीव ठरल्या असून त्यात अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन जागांचा समावेश आहे. या अनुषंगाने कानळदा अनुसूचित जाती (महिला), ममुराबाद अनुसूचित जमाती (महिला), आसोदा सर्वसाधारण (महिला), कुसुम्बे सर्वसाधारण (महिला) आणि मोहाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर गणांसाठीही आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले असून भोकर हा गण अनुसूचित जमातीसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी भादली बु. राखीव ठेवण्यात आला आहे, तर म्हसावद, शिरसोली प्र.न. आणि धानवड हे गण सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या आरक्षण प्रक्रियेने पंचायत समिती निवडणुकांची रंगत आणखी वाढली आहे.









