जळगावात उष्णतेचा विक्रम! सलग ४७ दिवस पारा ४० अंशांपार; आता जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’

मे 30, 2026 9:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्याने रौद्ररूप धारण केले असून गेल्या २४ वर्षांतील उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. यंदाच्या मोसमात सलग ४७ दिवस तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात सरासरी तापमानात तब्बल ६ अंश सेल्सिअसची वाढ झाली असून, जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

tapman

हवामान विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांत उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात केवळ काही दिवसच तापमान ४० अंशांवर गेले होते, मात्र यंदा मे महिन्यातील बहुतांश दिवस पारा ४० अंशांच्या वरच राहिला.

वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’

भीषण उष्णतेच्या लाटेनंतर आता जळगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात आता हवामान बदलत असून, हवामान विभागाने ३० मे ते १ जून दरम्यान जळगाव जिल्ह्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज असून वादळी वाऱ्याचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

असं राहणार आगामी पाच दिवस हवामान?
दिनांक ..तापमान आणि वातावरणाची स्थिती..

३० मे : ४१ अंश, सायंकाळनंतर पावसाची शक्यता
३१ मे : ४१ अंश, सायंकाळी वेगाने वाऱ्यांसह पाऊस, यलो अलर्ट
१ जून : ४० अंश, सायंकाळी वेगाने वाऱ्यांसह पाऊस, यलो अलर्ट
२ जून : ४० अंश, ढगाळ वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता
३ जून : ४० अंश, ढगाळ वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories