जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२५ । उत्तरेकडील शीत वाऱ्यामुळे राज्यभर थंडीचा कडाका वाढला असून यामुळे नागरिकांना हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. मात्र अशातच हवामान खात्यानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, किमान तापमानाच्या घसरणीलाही गुरुवारी ब्रेक लागला. वातावरणात बदल झाल्यानं गुरुवारी जळगावच्या तापमानात तीन अशापर्यंतची वाढ झाली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. याची तीव्रता वाढणार असल्याने दक्षिणेकडील राज्यांत पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. यातच मध्य महाराष्ट्रात 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या भागात पावसाचा अंदाज आहे. यासोबतच थंडीच्या लाटेचाही इशारा देण्यात आला

गुरुवारी धुळे येथे सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. 6.5 अंश तापमान धुळ्यात नोंदवले गेले. निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीत 8.4 तापमानाची नोंद झाली. नाशिक, भंडारा, आहिल्यानगर येथे पारा खाली गेल्याचे बघायाला मिळाले. पुढील काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शीतलहर काही अंशी ओसरली आहे. बुधवारी जिल्ह्यात ८.१ अंशांवरील पारा गुरुवारी पहाटे तीन अंशांनी वाढून ११ अंशावर पोहोचला होता. यामुळे थंडीचा फारसा प्रभाव जाणवला नाही. दरम्यान, आज शुक्रवारी देखील पारा याच पातळीवर राहणार आहे; परंतु शनिवारपासून (२२ नोव्हेंबर) तापमानात काहीशी वाढ होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.









