नैऋत्य मान्सून केरळच्या उंबरठ्यावर ; जळगावात आजपासून पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज..

जून 2, 2026 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२६ । जळगावसह राज्यातील उकाडा काहीसा कमी झाला असला तरी आता मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

rain 1

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही भागांत पावसासह तुरळक गारपिटीचीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, काल सायंकाळी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी बसरल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे जळगावकरांना उकाड्यातून दिलासा मिळाला. सोबतच तापमान देखील घसरले असून सोमवारी कमाल तापमान ४१ अंश इतके होते. आगामी दिवस पावसाचा अंदाज असल्याने तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट जारी

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी वादळी पाऊस व तुरळक गारपिटीचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाली असली तरी वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचा त्रास कायम आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत.

नैऋत्य मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेला नैऋत्य मान्सून आता केरळच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून पुढील दोन दिवसांत मान्सून केरळ तसेच तमिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनने १६ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांमध्ये वेळेआधीच प्रवेश करून दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे केरळमध्येही तो नेहमीपेक्षा लवकर दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र वातावरणातील बदलांमुळे त्याच्या पुढील वाटचालीला काहीसा विलंब झाला. सोमवारी मान्सूनची प्रगती स्थिर राहिली असली तरी पुढील ४८ तासांत केरळ, लक्षद्वीप, दक्षिण तमिळनाडू, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता असून आता राज्यातील शेतकरी राजा मान्सूनच्या अधिकृत आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories