जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२५ । गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या थंडीचे जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले आहे. मागच्या दोन दिवसात तापमानात मोठी घसरण झाली. २८ नोव्हेंबर रोजी जळगाव शहराचे तापमान १४ अंश सेल्सिअस होते, ते २९ नोव्हेंबर रोजी रात्री थेट ५ अंशांनी घसरून ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. यामुळे जळगावकरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात थंडीच्या लाटेने आपला प्रभाल दाखवल्यानंतर, काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण होऊन रात्रीचे तापमान अंशांवरून थेट १७ अंशांवर गेले होते. ज्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र आता ढगाळ वातावरण निवळून जिल्ह्यात कोरडे हवामान तयार झाले आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे.

दरम्यान हवामान खात्यानं आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. या काळात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पारा ७ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे.
आगामी पाच दिवसांतील तापमानाचा अंदाज
दिनांक आणि रात्रीच्या तापमानाचा अंदाज
१ डिसेंबर : ८ अंश
२ डिसेंबर : ८ अंश
३ डिसेंबर : ९ अंश
४ डिसेंबर : १० अंश
५ डिसेंबर : ९ अंश









