राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा महत्वाचा अलर्ट जारी; जळगावात कसं असेल हवामान? जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाच्याही जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याने आज (17 ऑक्टोबर) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पाऊस कोसळू शकतो. तर मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
त्याचवेळी, विदर्भातील काही भागात हलका पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत ऑक्टोबर हीट जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्याचबरोबर उर्वरित वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा वातावरण कोरडे राहून तापमान वाढण्याची शक्यता आहे.
जळगावात कसं असेल हवामान?
जळगाव जिल्ह्यात मागील चार पाच दिवसापासून उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा जळगावकरांना जाणवत असून दुपारनंतर उन्हाचा चटका बसत असून उकाड्यात वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाले आहे. आज जळगावात ढगाळ वातावरणाचा अंदाज असून आद्रता वाढेल. यामुळे उकाडा जाणवेल. मात्र जिल्ह्यात सध्या पावसाचा अंदाज नाहीय.