भाजप उमेदवाराच्या नाराजीपोटी चाळीसगावच्या १३ नगरसेवकांचा थेट मतदानावर बहिष्कार; राजकीय वर्तुळात खळबळ

जून 18, 2026 4:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत चाळीसगावमधून एक मोठी बातमी आहे. येथील लोकनेते अनिल देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष असे १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

chalisagaoncc

चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी हा निर्णय जाहीर केला. यावेळी निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर नाराजी व्यक्त केली. “भाजपचा उमेदवार मतदारांकडे साधे मत मागण्यासाठीही आला नाही. अशा उमेदवाराला आम्ही मत का द्यावे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”संयुक्त पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी बहिष्काराची घोषणा केली.

यावेळी लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्या या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now