जळगाव लाईव्ह न्यूज । देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशीचा अंगीकार करणे काळाची गरज आहे, असा सूर जळगाव जिल्हा प्रशिक्षण वर्ग आणि विचार वर्गात उमटला. ‘स्वदेशी जागरण मंच’ आणि ‘स्वावलंबी भारत अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यशाळेत विदेशी वस्तूंच्या विरोधात व्यापक जनजागृती करत स्वदेशीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व स्वदेशीचा विचार घराघरांत पोहोचवण्याच्या संकल्प करण्यात आला.

शनिवार, १६ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपारी २:०० या वेळेत दोन विविध सत्रांमध्ये हा प्रशिक्षण व विचार वर्ग संपन्न झाला. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २३ प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यशाळेदरम्यान ‘स्वदेशी’ संकल्पनेचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार करणे, जिल्हा स्वावलंबन केंद्राची बळकटीकरण, ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि आगामी काळात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘स्वदेशी मेळाव्या’चे नियोजन, यावर सविस्तर मंथन झाले. तसेच जळगाव जिल्ह्याचा आगामी काळातील विशेष कृती आराखडा या वर्गात तयार करण्यात आला.
कार्यशाळेच्या एका महत्त्वपूर्ण सत्रात व्यवस्थापन तज्ज्ञ आणि GIMR चे संचालक प्रा. डॉ. प्रशांत वारके यांनी उपस्थितांना संबोधित केले. “स्वयंरोजगार आणि स्वदेशीचे महत्त्व” या विषयावर बोलताना त्यांनी, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करून भारतीय अर्थव्यवस्थेला कशी गती देता येईल, यावर मार्गदर्शन केले.
प्रांत संयोजक शैलेश कंगळे यांनी या वर्गाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित केले. दुसऱ्या सत्रात प्रांत सह-समन्वयक डॉ. युवराज परदेशी यांनी ‘स्वदेशी जागरण मंच’ची संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये नव्या युगातील ‘स्टार्टअप्स’चे योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
जिल्हा सह संयोजक गिरीश बर्वे यांनी ‘स्वदेशी जागरण मंच’ आणि ‘स्वावलंबी भारत अभियान’ यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहिती दिली.’टीम इलेव्हन’चे सदस्य निलेश वाणी यांनी पहिल्या सत्राचे प्रास्ताविक करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला, तर समारोप सत्रात त्यांनीच सर्व उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षण वर्गाला युवा आयाम प्रमुख कमलेश सोनवणे, संपर्क प्रमुख अजिंक्य तोतला यांच्यासह मंचाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







