जळगाव जिल्ह्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’: करपणाऱ्या पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता

जुलै 21, 2026 9:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२६ । गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असतानाच भारतीय हवामान विभागाने आज मंगळवारी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Rain

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसासह मेघगर्जना आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात जवळपास मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. कापूस, सोयाबीन, मका आणि अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची भीती व्यक्त केली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः आभाळाकडे लागले असून समाधानकारक पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारनंतर जळगाव शहरातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. या सरींमुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी जिल्हाभरात पिकांना दिलासा देईल असा व्यापक पाऊस अद्याप झालेला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली अधिक बळकट होत असून तिचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांवर जाणवणार आहे. त्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारेही वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच मेघगर्जना सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

आता या यलो अलर्टनंतर जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस होऊन कोमेजलेल्या खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळते का, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now