Jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालयाच संतप्त पत्नीने पतीला दिला चोप; कारण काय?
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला बुधवारी सायंकाळी त्याच्या संतप्त पत्नीने कौटुंबिक वादातून भर रस्त्यावर चांगलाच चोप दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडल्याने नागरिकांची गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी तिच्या वडिलांसह रिक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. पतीला त्याच्या कार्यालयातून बाहेर बोलावले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच त्या कर्मचाऱ्याला पत्नीने जाब विचारला, पती व्यवस्थित वागवत नसल्याचा आरोप करत पत्नीने रस्त्यावरील काठी उचलत त्याच्यावर संताप काढला. एक महिला पुरुषाला मारत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांनी तिकडे धाव घेतली.
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेने त्यांच्यात मध्यस्थी केली. माझे आई-वडील आजारी असताना त्यांना सोडून पत्नी माहेरी निघून गेल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. पती, पत्नी, सासरा, ती राजकीय महिला पदाधिकारी रिक्षात बसून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.