जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२५ । राज्यासह जळगावमधील तापमान (Temperature)काहीसे वाढू लागल्याने थंडी (Cold) पुन्हा कमी झाली आहे. आसाम आणि आसपासच्या परिसरात चक्रवाती वारे सक्रिय आहेत. भारताच्या पश्चिमेस चक्राकार हवेचे झोत तयार होत असल्यामुळे थंडीच्या तीव्रतेत काही अंशी चढ-उतार होत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज रविवारपासून पुढचे पाच दिवस तापमानात वाढ होणार आहे. यामुळे ऐन थंडीत जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. Jalgaon Temperature Update

मागील काही दिवसापासून हवामानात सातत्याने बदल पाहायाला मिळाले. यामुळे कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असा अनुभव आला. गेल्या आठवड्यात जळगावात किमान तापमानाचा पारा १८ अंशावर गेल्यांनतर या आठवड्याच्या सुरुवातीला त्यात घसरण होऊन ते १३ अंशावर आले. परंतु म्हणावी तशी थंडीचा अनुभव जळगावकरांना आला नाहीय.
मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार होत नसल्यामुळे येत्या काही दिवसांत बदला पाहायला मिळतील. जळगाव जिल्ह्यात आज २६ ते ३१ जानेवारी दरम्यान कमाल तापमान ३२ ते ३४ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. तर किमान तापमानात मात्र अस्थिरता पाहायला मिळेल. ३१ जानेवारीपर्यंत किमान तापमान १४ ते १८ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे
या दरम्यान कधी किमान तापमान अचानक दोन ते तीन अंशांनी घसरलेले असेल किंवा वाढत जाईल, मात्र ते १४ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यानच राहील. रोज स्थिर राहणार नाही, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून किमान तापमानात एक ते दोन अंशांनी चढ-उत्तार सुरू आहे. हा चढ-उतार पुढील पाच दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.