जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाखा वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे तापमानात घट होऊन काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यातून जळगावकरांना दिलासा मिळाला होता. मात्र आता गारवा पूर्णपणे नाहीसा झाला असून पुन्हा एकदा कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. अवघ्या २४ तासांत जळगावच्या तापमानात तब्बल ४ अंशांची वाढ नोंदवली गेल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २२ मार्च रोजी जळगाव शहराचे तापमान ३३ अंश सेल्सिअस होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २३ मार्चला हा पारा थेट ३७.६ अंशावर पोहोचला. एकाच दिवसात झालेल्या या बदलामुळे उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. सध्या ‘मार्च’ महिन्याच्या अखेरीसच वैशाख वणव्यासारख्या उन्हाच्या झळांनी जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जळगावात पुन्हा अवकाळी पावसाचा शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. २९ मार्चपर्यंत शहराचा पारा ४० अंशांच्या जवळ किंवा त्यापुढे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र २९ मार्चनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे संकेत असले तरी, दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आगामी पाच दिवस असं राहणार तापमान?
दिनांक आणि तापमान
२४ मार्च : ३८ अंश
२५ मार्च : ३८ अंश
२६ मार्च : ३९ अंश
२७ मार्च : ३८ अंश
२८ मार्च : ३८ अंश
या गोष्टींची काळजी घ्या
दुपारच्या वेळेत कठोर परिश्रम टाळावेत, अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन टाळावे. उष्णतेच्या काळात उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वरील उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केलेले आहे.







