जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमान वाढत असून यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे. काल मंगळवारी जळगाव शहरातील तापमान ३४.४ अंशांवर नोंदवले गेले आहे. हेच तापमान आज बुधवारी एक ते दीड अंशाने वाढून ३५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी देखील तापमान वाढले आहे. तापमानातील ही वाढ उत्तर भारतामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे झाली आहे. अजून दोन दिवस उन्हाचा तडाखा राज्यात राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे एक ते दोन सेल्सियसने कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.
जळगावात उन्हाचा चटका वाढतोय?
जळगावमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळी जरी गारठा जाणवत असला तरी दुपारी कडक उन्हाळ्याचा अनुभव जळगाव येथील नागरिकांना येतो आहे. मंगळवारी शहरातील किमान तापमान १३ तर कमाल तापमान ३४.४ अंशांपर्यंत नोंदवले गेले. पुढील दोन दिवस त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
साधारणपणे मार्च महिन्यात होळीनंतर राज्यात तापमान वाढ होत असते. परंतु यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये वाढलेले तापमान हे उत्तर भारतातील झालेल्या हवामान बदलामुळे आहे. हे वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असणारा आहे.