जळगावकरांना आता उन्हाचे चटके सोसावे लागणार; सूर्याची आग ओकायला सुरुवात!

एप्रिल 9, 2026 12:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता पूर्णपणे ओसरला असून, सूर्याने पुन्हा आग ओकायला सुरुवात केली आहे. अवकाळीचे ढग विरल्याने जळगावचा पारा आता ३६ अंशांच्या पार पोहोचला असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

tapman

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावने ४० अंशांचा टप्पा ओलांडला होता, ज्यामुळे जळगावकर उन्हाने होरपळून निघाले होते. मात्र, मार्च अखेरीस निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने हजेरी लावली आणि तापमान ३५ अंशांच्या खाली आले होते. यामुळे जळगावकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. आता पुन्हा एकदा वातावरण कोरडे झाले असून गेल्या २४ तासांत जळगावचे तापमान ३६.४°C इतके नोंदवले गेले आहे.

दिवसा चटका, रात्री गारवा

सध्या जळगावमध्ये विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत असताना, रात्री वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणारा नाही. आकाश निरभ्र झाल्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असून आगामी दिवसात रात्रीच्या उकाड्यातही वाढ होणार आहे.

आजचे हवामान

आज जळगावमध्ये हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित असून सध्याचे तापमान ३४°C आहे. दिवसाचे कमाल तापमान ३६°C पर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान २२ ते २३°C राहील. वायव्य दिशेकडून ताशी ६ ते ८ मैल वेगाने वारे वाहत असून पावसाची शक्यता नाही आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता असून आठवड्याच्या अखेरीस तापमान ४२°C पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now