जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात आता सूर्याने पुन्हा आग ओकायला सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिळालेला गारवा पूर्णतः ओसरला असून आता सूर्यनारायणाने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘हिट लाट’ सदृश स्थिती निर्माण झाली असून, केवळ एका दिवसात जिल्ह्याचा पारा ३ अंशांनी वधारल्याने जळगावकर अक्षरशः भाजून निघत आहेत.

गुरुवारपर्यंत ३६.५ अंशांवर असलेला पारा शुक्रवारी अचानक ३८.८ अंशांपर्यंत पोहोचला. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या ४८ तासांत जिल्ह्याचे तापमान ४० अंशांचा टप्पा ओलांडेल, तर पुढील पाच दिवसांत ही तीव्रता ४३ अंशांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही वाढ होणार आहे. रात्रीचा पारा २२ ते २५ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळीही उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल.
का वाढतेय जळगावची उष्णता?
हवामान तज्ज्ञांच्या मते, या अचानक झालेल्या बदलामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत, एक म्हणजे निरभ्र आकाश: अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर झाल्याने आकाश स्वच्छ झाले आहे, परिणामी सूर्याची किरणे थेट जमिनीवर आदळत आहेत. तर उत्तर भारताकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमान झपाट्याने वाढलं आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी जळगाव महापालिका आणि आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्णालयांमध्ये उष्माघातावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून आवश्यक औषधे आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
उष्माघातापासून बचावासाठी ‘हे’ करा:
दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.
भरपूर पाणी, लिंबू सरबत आणि ताकाचे सेवन करा.
बाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करा.
चक्कर येणे किंवा मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.







