जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगावकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून जळगावहून मुंबईसाठी सुरू होणार दररोज थेट विमानसेवा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांच्या हवाई प्रवासाला आता आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. तो म्हणजे जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू होणार असून, ही सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून येत्या २५ ऑक्टोबरपासून चालवली जाणार असल्याची माहिती समोर आलीय.

विशेष म्हणजे आठवड्याचे सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध राहणार असल्याने मुंबईकडे विमानाने प्रवास करणाऱ्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या सेवेची आगाऊ तिकीट विक्री १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१कडून पुणे, गोवा आणि हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा दिली जात आहे. आता कंपनीकडून मुंबई हा चौथा मार्ग सुरू केला जाणार असल्याची माहिती आहे. या नव्या सेवेमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट विमानप्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा

नव्या वेळापत्रकानुसार जळगावहून मुंबईसाठी आठवड्याच्या सातही दिवशी फ्लाइट उपलब्ध राहणार आहे. त्यापैकी चार दिवस सायंकाळी ६.३० वाजता, तर उर्वरित तीन दिवस रात्री ९ वाजता जळगाव विमानतळावरून विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार आहे. हे विमान थेट नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करेल. जळगाव ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या १ तास ५ मिनिटे ते १ तास १० मिनिटांचा असणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

१ ऑक्टोबरपासून तिकीट बुकिंग

कंपनीमार्फत सध्या अंतिम वेळापत्रक व तिकिटांच्या दरांची निश्चिती करण्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून तिकीट विक्रीच्या आगाऊ नोंदणीला (Booking) सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलीय. तिकीट दर निश्चित झाल्यानंतर प्रवाशांना बुकिंग करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button