काळजी घ्या! बदलत्या हवामानामुळे जळगावकरांची वाढली चिंता

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । राज्यात सातत्याने हवामान बदल आहेत. सध्या राज्यात कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस असा दुहेरी बदल दिसून येत आहे. जळगावकरांनाही या बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतोय. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा किंचित घसरला होता. मात्र मागील दोन तीन दिवसात तापमानात वाढ झाली आणि पारा 42 अंशापर्यंत गेला जात आहे. यामुळे जळगावकर उकाड्यापासून हैराण झाला आहे.

त्यातच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस देखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस उन्हाचा पारा घसरून 39 अंशावर येणार असल्याने जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. मात्र, बदलत्या हवामानामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

लहान मुलांची काळजी घ्या…
बदलत्या हवामानाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. शिवाय लहान मुलांनाही सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे.

उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?
फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.
कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.
पुरेसं पाणी पित रहा.
सुती कपड्यांचा वापर करा
उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
उपाशीपोटी घराबाहेर पडू नका
तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळा.
गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.