जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ; पुढचे 72 तास राहणार असे?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२३ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी पावसाचं वातावरण होत असल्याने या बदलत्या वातावरणामुळे जळगावकर हैराण झाला आहे. काल सोमवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगावमध्ये सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंदवले गेले होते. मात्र उद्यापासून (२६एप्रिल) जळगावला येलो अलर्ट देण्यात आला असून यादरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा ४१ अंशावर गेला होता. यामुळे सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचा चटका लागत होता. दुपारच्या वेळेस तर कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. या कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या कडाक्याच्या उन्हात जळगावकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  

काल सोमवारी राज्यातील सर्वाधिक ३९ अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात जळगावात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारं ऊन अन् सायंकाळ नंतर ढगाळ वातावरण होत आहे. काही ठिकाणी तर सायंकाळी तुरळक पावसाच्या सरी बरसात आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण‎ झाल्यानंतर वारे बाष्प घेऊन प्रवास‎ करीत आहेत, परिणामी ढगांची‎ निर्मिती होऊन पाऊस पडतो आहे.‎ राज्यातील विविध भागात २४ एप्रिल ते २८ एप्रिल पर्यंत वादळी पावसासह गारपीटचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील उद्या म्हणजेच २६ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पाऊस झाला तर जळगावकरांना उकड्यापासून दिलासा मिळू शकतो पण शेतकऱ्यांचं टेन्शन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.