जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२६ । गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या जळगावकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनने अखेर मुंबईत दिमाखात एन्ट्री केली असून, आज मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. याचेच प्रतिबिंब जळगाव जिल्ह्यातही पाहायला मिळाले असून, आज पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.

पहाटेच्या या पावसामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला असला, तरी जळगावकर अजूनही मोठ्या प्रमाणावर दमदार आणि सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान पुढील ३ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. २२ ते २५ जून या कालावधीत आकाश अंशतः ते पूर्णतः ढगाळ राहणार असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात. यामुळे जळगावकरांना दमदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून २५ जूननंतर दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. रविवारी जळगावचे कमाल तापमान ४०.२ तर किमान तापमान २७ अंशावर होते. रविवारी दिवसभर उन्ह-सावलीचा खेळ सुरू होता; पण उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
पाऊस का रखडला?
मान्सूनचा मुख्य पट्टा सध्या भारताच्या दक्षिण भागात अधिक सक्रिय आहे. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण तयार झालेले नाही.प्रशांत महासागरातील वातावरणीय बदलांमुळे आणि उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्याने मान्सूनची गती मंदावली आहे.
पाऊस पडण्यासाठी तापमान आणि आर्द्रतेचे गणित जुळणे अत्यंत आवश्यक असते. सध्या जिल्ह्यातील तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास असल्याने हवेचा दाब कमी होतो, पण हवा कोरडीच राहते. परिणामी गरम हवा वर जाते, विजा चमकतात, ढगही दाटून येतात; पण हवेत पुरेसा ओलावा नसल्याने पाऊस पडत नाही. जेव्हा तापमान ३४ ते ३५ अंशांच्या खाली येईल आणि हवेतील आर्द्रता वाढेल, तेव्हाच मान्सूनचे वारे मजबूत होऊन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होईल, असं हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहेत.







