⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

फरार ‘अरुण गवळी’ जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या अरुण भगवान गवळी या आरोपीने सोमवारी जिल्हा न्यायालय परिसरातून लघुशंकेचा बहाणा करीत पोलिसांचे लक्ष चुकवून पळ काढला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या २४ तासात तपासचक्रे फिरवीत त्याच्या गावाहून मुसक्या आवळल्या.

पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लौंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी वय-२७ रा.गुम्मी ता.जि.बुलढाणा याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोना काळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर करणार होते. पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला हजर करण्याकामी जिल्हा न्यायालयात घेऊन आले असता दुपारी ४.४५ च्या सुमारास अरुण गवळी याने लघुशंकेचा बहाणा केला.

पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले आणि गुन्ह्याच्या केस वॉच यांना गुन्ह्यातील डी.एन.ए. अहवाल प्राप्त नसल्याबाबत कळवीत होते. पोलिसांची नजर चुकवून अरुण गवळी याने पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरुण गवळीच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना सूचना केल्या होत्या.

एलसीबीच्या पथकातील हवालदार महेश महाजन, पोलीस नाईक नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील यांनी अवघ्या २४ तासांच्या आत तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे अरुण गवळी याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने त्याला त्याच्या गावातून अटक करून पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.