जळगाव पोलिसांची रात्रीत मोठी कारवाई! दारू विक्रेते, जुगारी अन् टवाळखोरांवर एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक

जून 2, 2026 1:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी काल रात्री अचानक विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे, टवाळखोर आणि सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली आहे. या रात्रीच्या मोहिमेत पोलिसांनी दारूबंदी, जुगार आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ddkkk

या मोहिमेत पोलिसांनी सर्वाधिक कारवाई अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर केली. मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट (दारूबंदी कायदा) अंतर्गत एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ५२ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १०५ देशी दारूच्या बाटल्या, २८ विदेशी दारूच्या बाटल्या, १५ बिअरच्या बाटल्या, ३१३ लिटर हातभट्टीची दारू, ४ हजार ५०० लिटर कच्चे रसायन तसेच १ हजार ६०० लिटर केमिकल यांचा समावेश आहे.

याशिवाय, जिल्ह्यातील विविध भागांत अवैध रित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी २ गुन्हे दाखल केले असून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या व्यक्तींविरोधातही पोलिसांनी मोहीम राबवली. त्याअंतर्गत बीपी ॲक्टच्या कलम ११२ व ११७ अन्वये १९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या सात जणांविरुद्ध स्वतंत्र कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now