राष्ट्रीय स्पर्धेत जळगाव पोलिसांच्या स्केटिंग क्लबची दमदार कामगिरी

जुलै 10, 2026 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या ४७ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मैदानावर आपला दबदबा निर्माण केला आहे. विविध वयोगटातील अटीतटीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत जळगावच्या चिमुरड्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची मोठी कमाई केली आहे. या यशामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा उपक्रमांना नवी ओळख मिळाली असून खेळाडू आणि प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Skating Club

सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे (मानव संसाधन विभाग) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी वेग, कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले.

४ ते ६ वर्षे वयोगटात विराज मनोज सावळे याने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तसेच रिले स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. याच गटातील आरोही दर्शन गोसावी हिने १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवत जिल्ह्याचा गौरव वाढवला.

६ ते ८ वर्षे वयोगटात रसिका नंदकिशोर पवार हिने १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. रिले स्पर्धेतही तिने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदकाची कमाई केली.

८ ते १० वर्षे वयोगटात राजवीर नंदकिशोर पवार याने १०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावत रिले स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. देविक विनोद साळुंखे हिने १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले, तर रिले स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले. मिष्टी निलेश भोळे हिने १०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवून आपली छाप पाडली.

१० ते १२ वर्षे वयोगटात लावण्या निलेश भोळे हिने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.तर ११ ते १४ वर्षे वयोगटात तन्मय धिरज सोनवणे याने १०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक मिळवले असून रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

या उल्लेखनीय यशामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लबची राष्ट्रीय स्तरावर छाप अधिक मजबूत झाली असून, खेळाडूंच्या मेहनतीसह प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी स्पर्धांमध्येही हे खेळाडू अशीच दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now