जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी विशेष नाकाबंदी मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३११ प्रकरणे नोंदविण्यात आली असून ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही मोहीम जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान राबविण्यात आली. मोहिमेत अपर पोलिस अधीक्षक, विविध उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाभरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

कारवाईदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ४४ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या ७८ वाहनांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या १०६ जणांवर कारवाई करण्यात आली असून विनालायसन्स वाहन चालवणाऱ्या १४ वाहनचालकांविरोधातही गुन्हे नोंदविण्यात आले. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणारी ९ वाहने जप्त करण्यात आली.
दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ८ वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेत ३२ पोलिस अधिकारी आणि २२२ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









