जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२६ । अमेरिका आणि इराण यांच्यामधील वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम जगासह भारताला सोसावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अवघ्या दहा दिवसांत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. चालू मे महिन्यात इंधन दरवाढीची ही तब्बल चौथी वेळ असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे पार मोडून गेले असून, कौटुंबिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

आजपासून पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ७३ पैसे, पॉवर पेट्रोल २ रुपये ७३ पैसे तर डिझेल दोन रुपये ८१ पैशांने वाढले आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून ही नवीन दर वाढ लागू झाली आहे. या नव्या वाढीनंतर आता जळगाव जिल्ह्यात पेट्रोल ११३.१७ रुपयांवर तर तर डिझेल जवळपास ९९.८४ रुपये प्रति लिटर या उच्चांकी दराने विकले जात आहे. यापूर्वी काल रविवारी पेट्रोल ११०.४४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा ९७.०१ रुपये प्रति लिटर दर होता. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून,वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मे महिन्यात झालेल्या दरवाढीत पेट्रोल आणि डिझेल ८ रुपयांहुन अधिकने महागले आहे. १४ मेपर्यंतचे पेट्रोलचे १०५.११ रुपये आणि डिझेल ९१.६४ रुपये होते. १५ मे (पहिली दरवाढ) थेट ३.१४ रुपयांपेक्षा जास्त वाढ होऊन पेट्रोल १०८.२४ रुपये आणि डिझेल २४.७४ रुपयांवर पोहोचले. यानंतर दुसरी वाढ १९ मे रोजी २१ पैशांची वाढ झाली. २३ मे रोजी तिसरी दरवाढ झाली यात पेट्रोलच्या दरात ९० पैशांची वाढ झाल्याने ११०.४४ रुपयांचा टप्पा ओलांडला. तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ झाली आहे. यांनतर आज २५ मे रोजी पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ७३ पैशांनी पुन्हा वाढले. तर डिझेल दोन रुपये ८१ पैशांने वाढले आहे.
इंधनाच्या या भडकलेल्या दरांमुळे केवळ वाहनचालकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले आहेत. डिझेल महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढणार असून, पर्यायाने भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.






