⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

लिपिकानेच केला संजय गांधी योजनेत १४ लाखांचा गैरव्यवहार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या संजय गांधी योजनेच्या विभागातील महसूल सहाय्यक लिपीकाने बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी व शालकाच्या बँकेच्या खात्यात परस्पर १३ लाख ९० हजार रूपये वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लिपीकासह अन्य दोन जणांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, शहरातील रेल्वे स्टेशन रोड येथील संजय गांधी योजना ‘अ’ वर्ग  नगरपालिका क्षेत्र येथील कार्यालयात महसूल सहाय्यक लिपीक म्हणून असलेले संदीप प्रल्हाद शिरसाठ रा. आम साईराम नगर, वाघ नगर यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे  पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि स्वताच्या खात्यात नोव्हेबर ते डिसेंबर २०२० या दोन महिन्याचे योजनेच बील अनुक्रमे २० हजार आणि ४० हजार रूपये वर्ग करून घेतले. 

त्यानंतर जानेवारी ते मार्च २०२१ च्या योजनाच्या बिलांमध्येही फेरफार करून पत्नी सोनल शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव यांच्या खात्यात १३ लाख ५० हजार रूपये वर्ग व्हावे यासाठी दोघांचे खाते क्रमांक दिले होते. परंतू १३ लाख ५० हजार रूपयांची रक्कम वर्ग करतांना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेने थेट संजय गांधी योजनेचे तहसीलदार यांना पत्र कळवून दोन नावे वेगवेगळी आणि खाते क्रमांक एकच असल्याचे कळविले. त्यानुसार तहसीलदार यांनी मुळ लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर ही तफावत दिसून आली. 

महसुल सहाय्यक लिपीन शिरसाठ यांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी अनिल पठाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात महसूल सहाय्यक लिपीक संदीप प्रल्हाद शिरसाठ, पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.