जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२५ । जळगावच्या महानगरपालिकेतून एक मोठी बातमी समोर आलीय. सहकारी डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग आणि जन्म-मृत्यू विभागात पत्नीच्या जागेवर पतीला रूजू केल्याच्या आरोपावरून महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना गेल्या महिन्यात निलंबित केले होते. मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आदेश काढले होते. दरम्यान सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा आरोप डॉ. घोलप यांच्यावर करण्यात आला आहे.

सदर घटना महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घडल्याचे पीडित महिला डॉक्टरने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. त्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात आता डॉ. घोलप यांना चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनीही त्यास दुजोरा दिला. विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. घोलप यांना पोलिसांनी अटक केल्याने महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही डॉ. घोलप यांच्या पराक्रमामुळे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.












