जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापौर दीपमाला काळे यांनी जाहीर केलेल्या ‘अभय शास्ती’ योजनेला नागरिकांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योजनेमुळे महापालिकेच्या वसुलीत तब्बल पाच पटींनी वाढ झाली असून पहिल्याच दिवशी सुमारे २६ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून थकबाकी वसुलीसाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विशेष पथके कार्यरत केली होती. मात्र या प्रयत्नांनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता आणि दररोज केवळ ४ ते ५ लाख रुपयांचीच वसुली होत होती. अनेक थकबाकीदारांनी महापालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, महापौरांनी थकबाकीदारांना दिलासा देत शास्ती (दंड) माफीसह ‘अभय शास्ती’ योजना जाहीर केली आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. योजनेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी भरून प्रतिसाद दिला. ही योजना ५ ते १९ मार्च या कालावधीत राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी २६ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. असे असले तरी मनपासमोर १५ दिवसांत १४० कोटी वसुलीचे आव्हान आहे.











